औरंगाबाद – पूर्वीची नांदेड- पुणे द्वी साप्ताहिक एक्सप्रेस चे रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये करण्यात आले आहे. या एक्सप्रेसला आता एलएलबी कोचेस लावण्यात आले आहेत. मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नांदेड- हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये पहिल्यांदाच थर्ड एसी इकॉनोमी क्लास बोगी देण्यात आली आहे. या बोगी मुळे नियमित थर्ड एसी बोगीच्या तुलनेत अगदी कमी पैशात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.
नांदेड-पुणे या द्वी साप्ताहिक एक्सप्रेसच्या वेळेत आणि रेल्वे स्थानकात आणि काही रचनेत बदल करण्यास काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. त्यानुसार आता ही रेल्वे पुणे स्थानकावर ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत धावेल आणि हडपसर वरूनच सुटेल. या रेल्वेला 20 बोगी राहणार आहेत. या सर्व बोगी एलएलबी आहेत. त्यामुळे हडपसर पर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायक होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेत प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचबरोबर रेल्वे जीपीएस प्रणाली असून प्रत्येक बोगीत स्पीकर ची व्यवस्था आहे. त्यातून रेल्वे नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती प्रवाशांना मिळेल.
औरंगाबाद ते हडपसर 8 तासांत –
ही रेल्वे नांदेड हुन रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. औरंगाबादला रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी दाखल होईल, तर रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी औरंगाबाद येथून सुटून हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. या रेल्वेला दोन्ही दिशेने पुर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड जंक्शन, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड या रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.