औरंगाबाद – बहुप्रतीक्षित नांदेड- मनमाड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे वैजापुरकरांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रयत्नशील आहोत. विशेष म्हणजे विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून दुहेरीकरण मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे वैजापुरकरांचे हे स्वप्न पूर्ण करू तसेच इतर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी वैजापुरकरांना दिला आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे निमित्त शनिवारी (ता.२८) वैजापूर शहरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यात्रेचे शहरात आगमन होताच जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कराड यांच्या स्वागतासाठी शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहर हे भाजपमय झाले होते.
जनआशीर्वाद यात्रेच्या रथामध्ये आमदार अतुल सावे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे यांची उपस्थिती होती. डॉ. कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या कारभारावर अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या सात वर्षात ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारच्या योजना हाती घेतल्या आणि कोरोनासारख्या संकटात प्रभावी काम करत सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचे रक्षण केलं. तसेच रेल्वेच्या प्रश्नावर केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयाचा निधी मराठवाड्यात दिलेला आहे.
दरम्यान मी मराठवाड्याचा सुपुत्र असून प्रत्येक भौतिक विकास प्रश्नांची मला जाण आहे. आगामी काळात काम करताना सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन ज्या विकास प्रश्नाचे प्रस्ताव माझ्याकडे येतील, त्यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही त्यांनी ठक्कर बाजार येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना दिली.