हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी रस्त्याच्या अभावामुळे एका गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झाली. मात्र, वेळेत उपचार न झाल्यामुळे या नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीयांना जंगल मार्गे तब्बल १५ किलोमीटरचा कठीण प्रवास करावा लागला. हा सर्व प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळील केलापाणी गावात घडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, केलापाणी गावातील पाटीलपाडा येथे सुमारे ५३० लोकसंख्या आहे. गावाला रस्त्याची सोय नसल्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या आहे. २५ जानेवारी २०२४ रोजी केलापाणी ते कालापाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, संपूर्ण वर्ष उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. या मार्गाचे एकूण अंतर १५ किलोमीटर असून केवळ ५ किलोमीटर रस्ता मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित मार्ग अद्याप कच्चा असून, त्याचा फटका येथील रहिवाशांना सतत बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून केलापाणी गावातील एका गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली होती. मात्र, रस्त्याअभावी तिला वेळेत रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही. अखेर, कुटुंबीयांनी घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. परंतु दुर्दैवाने नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात हलवण्यासाठी कुटुंबीयांनी हालचाल केली. मात्र, रस्ता नसल्याने त्यांना या महिलेला बांबूच्या झोळीत टाकून जंगल मार्गाने दवाखान्यात घेऊन जावे लागले. या प्रवासासाठी तब्बल ५ तास लागले. अखेर महिलेला ५ तासानंतर तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्येही नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात अशीच हृदयद्रावक घटना घडली होती. खुटवडा गावातील गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी तिच्या कुटुंबीयांना पुराच्या पाण्यातून आठ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला होता. वेळीच रुग्णालयात पोहोचू न शकल्यामुळे नदीपात्राजवळच महिलेची प्रसूती झाली होती.
आदिवासी भाग सुविधांपासून अद्याप वंचित
राज्यातील विविध भागांमध्ये मोठमोठ्या रस्त्यांची कामे वेगाने सुरू असताना आदिवासी भाग मात्र सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने आरोग्य सेवेचा अभाव, वाहतूक अडथळे आणि आपत्कालीन परिस्थितीत जीव गमावण्याची वेळ येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित रस्त्याच्या कामांना गती देणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.