हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टी आली असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. त्यातच आज भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे . उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या परिस्थितीची शून्य जाण असून ते महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करुन काय साधणार आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे राज्यातले सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवार आजपासून दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपासूनच बारामतीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’