हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जनाच भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी केली आहे. कोकणचे आमदार विधानसभेत कोकणचे कोणतेही प्रश्न उपस्थित करत नाहीत ,पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत.असा आरोपही राणेंनी केला.
कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावाही नारायण राणे यांनी केला. शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
कोकणातील हे 11 आमदार विधानसभेत कोकणातील विकासा संदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाहीत. त्यामुळे आमदार काहीही करू शकत नाही. पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत. ते जिल्ह्यात येऊन काय करतात हे एक दिवस सांगेन, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेचे आमदार विधानसभेत नाही बोलले तरी कोकणाचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवलं आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे. त्यासाठी भाजप आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’