हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) निवडणुकीसाठी नारायण राणे याना उमेदवारी जाहीर कऱण्यात आली अन कोकणात राणे विरुद्ध राऊत (Rane Vs Vinayak Raut) असा सामना रंगणार हे स्पष्ट झालं. महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजप लढवणार कि शिंदे गट लढवणार यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रकारे नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणात झंझावाती दौरे करण्यास सुरुवात केली त्यावरून राणेंची उमेदवारी फिक्स मानली जात होती. अखेर आज भाजपने नारायण राणे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तगडं आव्हान दिले आहे. राणेंच्या उमेदवारीमुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्व शिवसेना असा सामना दिसताना मिळेल. कोकणच्या या राजकीय शिमग्यात कोणाचा विजय होईल?? विनायक राऊत राणेंना धूळ चारत ठाकरेंचा बालेकिल्ला अबाधित ठेवतील?? कि नारायण राणे आपल्या मुलाच्या पराभवाचे उट्टे काढतील?? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे गणित नेमकं आहे तरी कस? तेच आज आपण जाणून घेणार आहोत
यापूर्वी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निडवणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा दणदणीत पराभव करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकावला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १३ खासदारांनी पक्षातून बंड केल्यानंतरही विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रति असलेली आपली निष्ठा सोडली नाही. जेव्हा जेव्हा कोणी ठाकरेंवर वार केला तेव्हा तेव्हा विनायक राऊतांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंना साथ दिली. त्याचे फळ म्हणजे यंदा सलग तिसऱ्यांदा उद्धव ठाकरेंकडून विनायक राऊत याना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. परंतु शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे यंदाची निवडणूक सोप्पी नसेल याची जाण विनायक राऊत याना आहे.
वरवर हि लढाई राणे विरुद्ध राऊत अशी दिसत असली तरी खरी लढाई राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हाडवैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. राणे पिता- पुत्र अनेकदा पातळी सोडून ठाकरे कुटुंबियांवर टीका करत असतात. ठाकरेंना कोकणात शह देण्यासाठीच भाजपने नारायण राणेंना पक्षात घेतलं आणि बळ सुद्धा दिले. आताही ठाकरेंचं कोकणातील उरलंसुरलं अस्तित्व संपवण्यासाठीच भाजपने नारायण राणेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. पक्षीय बलाबल पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यातील चिपळूणचे शेखर निकम हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. रत्नागिरी मधून शिंदे गटाचे उदय सामंत, राजापूर मधून ठाकरेंचे राजन साळवी, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे, कुडाळ मधून ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि सावंतवाडी मधून शिंदे गटाचे दीपक केसरकर आमदार आहेत. त्यामुळे हे पक्षीय बलाबल पाहता राणेंचं पारडं जड वाटतंय… एकेकाळचे राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे दीपक केसरकर यंदा महायुतीचा धर्म पळून थेट राणेंच्या प्रचारात उतरल्याने नारायण राणेंचं बळ नक्कीच वाढलं आहे. त्यातच मधल्या काळात विनायक राऊतांचा तुटलेला जनसंपर्क यामुळे कोकणात राणेंचा विजय नक्की मानला जात आहे. भाजपची वैयक्तिक अशी कोणतीही ताकद नसताना फक्त राणेंचा करिष्मा आणि शिंदे गटाची साथ यावरच रत्नागिरी सिंधुदुर्ग काबीज करण्याचे राजकीय गणित आहे.
कोकणातील रखडलेला विकास, मुंबई गोवा महामार्गाचे अर्धवट काम, अपुरे उद्योगधंदे, नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध, यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छिमारांना येत असलेल्या अडचणी, पर्यटनाबाबत अपुऱ्या सोयीसुविधा हे कोकणवासीयांची प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या हे सर्व प्रश्न सोडवणारच खासदार पाहिजे असं कोकणच्या जनतेचं म्हणणं आहे. कोकणच्या जनतेने राज्यात आणि देशात सत्ताबदल बघितला परंतु कोकणवासीयांचे महत्वाचे प्रश्न आणि अडचणी जैसे थे च आहेत.
दुसरीकडे विनायक राऊत यांच्या मजबूत बाजू सांगायच्या झाल्यास, १० वर्ष खासदारकीचा अनुभव, उद्धव ठाकरेंसोबतची त्यांची एकनिष्ठता त्यांना तारून नेईल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बंडखोरी आणि गद्दारीला जनता कंटाळली आहे. त्यातच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेली सहानभूती… शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणच्या जनतेने ठाकरे घराण्यावर केलेलं प्रेम.. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले त्यामुळे जनतेच्या मनात असलेली चीड मतपेटीतून दिसू शकेलं. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेची ताकद असूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपच्या वाट्याला गेल्याने मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पक्षाला म्हणजेच विनायक राऊतांना मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राणे विरुद्व राऊत असा सामना रंगतदार होणार हे फिक्स आहे…. तुम्हाला काय वाटत? कोकणात विनायक राऊत खासदारकीची हॅट्रिक करतील? कि मुलाच्या पराभवाचा बदला घेत राणे ठाकरेंवरच मात करतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करा.