नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे सभा होणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मैदानावर मोठ्या प्रमाणात सापांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे साप दिसल्यास त्याला तत्काळ पकडण्यासाठी आयोजकांनी जवळपास २५ ते ३० सर्पमित्रांची फौज तैनात केली आहे. सभेचा मंडप उभारला जात असतानाच एक कोब्रा जातीचा साप आढळला होता. सर्पमित्रांनी लगेच त्याला पकडून भरणीत बंद केले.
मोदींच्या सभास्थानी सापांचा सुळसुळाट
नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव येथील बाजार समितीच्या मैदानावर मोदींची प्रचारसभा होणार आहे. ६०० एकर जमिनीवरील १०० एकर जागेत सभेसाठी मैदान तयार करण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान मैदानावर विषारी, बिन विषारी असे शेकडो साप निघत असून त्यांना पकडण्यासाठी प्रशासनाची पूर्ती झोप उडाली आहे.
त्यातच सभेचा दिवस जवळ आल्याने आणि ऐन सभेत सापामुळे कोणती दुर्दैवी घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने सभेच्या दिवशी केवळ साप पकडण्यासाठी तब्बल २० ते ३० सर्प मित्रांची फौज तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेसाठी सर्प मित्रांना स्पेशल पास देण्यात येणार आहेत. तसेच साप पकडण्यासाठी लागणारी काठी, बरणी, जाळी, कापडी पिशवी हे साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.