कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गुजरात निवडणुकीत आज मतदाना दिवशी नरेंद्र मोदींनी रोड शो केला. खरे तर या प्रकारामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातच्या निवडणुकीबद्दल चिंता वाटत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेळप्रसंगी कायदे मोडून देखील नरेंद्र मोदी आपल्या पक्षाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रचार करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टी दुर्दैंवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व गुजरात विधानसभा निवडणुकीचे काॅंग्रेसचे निरीक्षक पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
गुजरात येथे दुसऱ्या टप्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ते म्हणाले, आज विधानसभा निवडणुकी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मतदान केले. तो त्यांचा अधिकार आहे. मतदानानंतर नरेंद्र मोदी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली तसेच रोडशोही केला. या माध्यमातून अप्रत्यक्षपणे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. या गोष्टी त्यांनी करायला नको होत्या. सर्व निवडणुका पक्षपातीपणे झाल्या पाहिजेत. हे सर्वांना वाटत असून लोकशाहीचे ते मूळ सूत्र आहे.
आजच्या घडामोडीकडे निवडणूक आयोग पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या समोर निमूटतपणे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होते. ही चांगली गोष्ट नव्हती. खरे तर या प्रकारामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातच्या निवडणुकीबद्दल चिंता वाटत असल्याने घडला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.