सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाटील यांच्या ठाकरे भेटीने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले असून सातारा लोकसभेसाठी नरेंन्द्र पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार काय असा सवाल उपस्थीत झाला आहे.
मात्र ‘आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये आहेत. ते आज माझी भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आले आहेत. या भेटीचा अर्थाचा अनर्थ होऊ नये. या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नका असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
तसेच नरेंद्र पाटील यांच्या संदर्भातील चर्चा मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी मिळून करू. त्यासंदर्भातील निर्णय रविवारी तुम्हाला कळेलच, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.