कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवसेना – भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले असल्याने त्यांना हटवावे तर मोठे योगदान असलेल्या एकनाथ शिंदे यांची अध्यक्षपदी असावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली होती असे आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. हॅलो महाराष्ट्रसाठी दिलेल्या एक्सक्ल्युझिव मुलाखतीत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
नरेंद्र पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात केलेल्या समितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील होते. ते मिटींग घ्यायचे, त्यावेळी ते सर्वांना एकत्र घेवून बसायचे. चर्चा व्हायची. त्यांनी योग्य पध्दतीने प्रश्न हाताळला होता. वेगवेगळ्या योजना काढल्या. मात्र अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकही बैठक होत नाही, कोर्टात वकील उपस्थित राहत नाहीत. युक्तिवाद काय करायचे यांची चर्चा होत नाहीत. आजपर्यंत ९ सप्टेंबरचा असो किंवा २७ तारखेचा निकाल हे दोन्ही मराठा समाजाच्या विरोधात झालेले आहेत. अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या वडिलांनी राज्याच्या राजकारणात विविध पदे भूषविलेली होती. अशावेळी कर्तृत्व दाखवायची संधी आली. परंतु त्यांच्याकडून आम्हां मराठा समाजाला अपयश मिळाले. नुकसान समाजाचे झाले अशोकराव चव्हाणांचे नुकसान नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटविले पाहिजे.
पुढे नरेंद्र पाटील म्हणाले, शिवसेना- भाजपाचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मराठा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हे आरक्षण जाहिर केले. त्यानंतर आलेले मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनीही तशाच प्रकारचे पूर्ण आरक्षण टिकवणार अशाच प्रकारची भूमिका घेतलेली होती. परंतु मंत्रिमंडळाची जी समिती गठित करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे आहेत. त्यांच्या माध्यमातून जो योग्य पाठपुरावा व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही. त्यामुळे ९ सप्टेंबरला मोठ्या बँचेकडे सोपवला. त्याच बरोबर राज्य सरकारने १२ आणि १३ टक्के आरक्षण दिलेले होते, त्याला स्थगिती दिली, असा आश्चर्यजनक निकाल सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मिळाला.
आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती की, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे, त्यांचे त्यांना अध्यक्ष करा. कारण ज्यावेळेला भाजप- शिवसेनेचे सरकार होते, त्यावेळेच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते. मराठा समाजाच्या मुले- मुलींच्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले वसतिगृह जे झाले ते एकनाथ शिंदेनी केले. यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवल, त्यांनी मराठा समाजाला थर्ड लावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’