हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक नुकतेच रवाना झाले आहे.
मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असल्याने पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिलेत. आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले.