लासलगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लोणवाडी परिसरातल्या शेततळ्यात पडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. कुणाल गायकवाड आणि गौरव गायकवाड असे मृत्यू पावलेल्या दोन भावांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुणाल आणि गौरव खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते फिरता-फिरता शेततळ्याकडे गेले.
लहानगा कुणाल शेततळ्यातल्या पाण्यात पाय घसरून पडला. ते पाहून गौरवने आरडाओरडा केला. मात्र, परिसरात कोणी नव्हते. त्याच्या मदतीला कोणीच आले नाही. शेवटी कुणालला बाहेर काढण्यासाठी गौरव पाण्यात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातल्या पाटे या ठिकाणी ओम तळेकर आणि प्रणव तळेकर या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यातला ओम हा 13 वर्षांचा होता. तो इयत्ता सातवीच्या वर्गात शिकायचा. दुसरा मुलगा प्रणव. तो 11 वर्षांचा होता. हे दोघे भाऊ घरातील शेळ्या शेतात चारायला घेऊन गेले होते. शेळ्या नाल्याजवळ गेल्या. तिथून जवळच पुढे शेततळे होते. त्यांनी शेततळ्याकडे पळ काढला. यावेळी प्रणव शेततळ्यावर गेला असता त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. आपला लहान भाऊ शेततळ्यात पडल्याचे दिसताच ओमने त्याला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. त्यामध्येच या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.