गांधीनगर | आशियायी सिंहाचे घर समजल्या जाणार्या गिर राष्ट्रीय उद्यानात ११ सिंहांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आधीच चिंताजनक परिस्तिती असणार्या आशियायी सिंहांचा एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमींकधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत सिंहांमधे ३ मादी, २ नर तर ६ बछड्यांचा समावेश आहे. यासंबंधी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले असून वनखाते सिंहाच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध घेत आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे बहुतेक सिंहांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. जुनागढ पशुवैद्यकीय रुग्णालयातून अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पशुवैद्यकीय अधिकारी एच. वामजा यांनी सांगितले आहे. तसेच, इतर सिंहांना संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अाशियायी सिंह ही धोक्यात असलेली वन्यजीव प्रजाती असून गिर राष्ट्रीय उद्यान हे त्यांचे अखेरचे निवासस्थान असल्याचे बोलले जाते. २०१५ साली करण्यात आलेल्या वन्यजीव गणणेनुसार गिरच्या जंगलात एकुण ५२३ सिंह अाहेत.