राष्ट्रवादीचा आमदार दलाल? गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या बॅनरमुळे वातावरण तापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एटापल्ली प्रतिनिधी । मनोहर बोरकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा (MLA) दलाल असा उल्लेख करत नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत (Gadchiroli) बॅनरबाजी केली आहे. एटापल्लीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram) यांना जाहीरपणे दलाल म्हणून नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी केल्याने जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक दिवसांपासून शांत असलेले नक्षली मागील काही दिवसांपासून डोकेवर काढताना दिसत आहेत.

तालुक्यातील सुरजागड लोहखनिज (Surjagad Mining) पहाडी परिसरात नक्षल्यांनी बांधलेल्या बॅनरमध्ये आमदार धर्मरावबाबा आत्राम हे लोहखनिज विस्ताराचे समर्थक व दलाल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सदरचे बॅनर सुरजागड लोहखनिज उत्खनन पहाडीच्या पायथ्याशी बांधण्यात आले असून सुरजागड यात्रा महोत्सवावर नक्षली दहशतीचे सावट पसरले आहे. बॅनरमध्ये भाकपा (माओवादी) असा शेवटी उल्लेख करण्यात आला आहे.

सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात 5 जानेवारी ते  जानेवारी दरम्यान आदिवासींचे दैवत ओअदाल पेन, ठाकूर देवाच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी गडचिरोलीसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, जिल्ह्यातून व लगतचे छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून आदिवासी भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात. यात्रा महोत्सव सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ४ जानेवारीच्या मध्यरात्री सुरजागड पहाडी परिसरात माडिया आदिवासी भाषेत मजकूर लिहिलेले बॅनर बांधून पुन्हा एकदा आमदार धर्मरावबाब आत्राम यांच्या जनविरोधी अजेंड्याचा ग्रामसभांकडून भांडफाड केला जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेली एक ते दीड वर्षापासून शांत असलेल्या नक्षली चळवळीने (Naxal Movement) गेल्या दोन आठवड्यात प्रेसनोट प्रसारण, पोस्टर व बॅनर झळकावून डोके वर काढताना दिसत आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वीच नक्षल्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोलीचा प्रवक्ता श्रीनिवास याने आपल्या सहीनिशी 18 डिसेंबर 2022 ला प्रेस नोट प्रसारित करून आमदार धर्मरावबाबा आत्राम हे लॉयल्ड्स मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीची दलाली करून आदिवासींच्या हक्काचा सुरजागड पहाड नेस्तनाभूत करत असल्याचे म्हटले होते.

त्यामुळे नक्षल्यांकडून आमदार आत्राम यांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार आत्राम यांना उच्च दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ केल्याने चवथाळलेल्या नक्षल्यांनी लगेच ३१ डिसेंबर ला दुसरी प्रेस नोट प्रसारित करून आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अमरीश आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम या राजघराण्यांच्या आदिवासी नेतृत्वाचे वाभाडे काढुन गाव ग्रामसभांनी आत्राम राजघराण्याच्या पुढाऱ्यांना गावात प्रवेश करण्यास बंदी घालून हाकलून लावण्याचे आवाहन केले होते.