सुनेत्रा पवारांना राज्यसभा? आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव फायनल करण्यात आलं असून आजच दुपारी त्या आपला अर्ज भरणार आहेत. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, त्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावावर एकमत झालं आहे. आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. शरद पवार गटाकडून ही राज्यसभा आपल्याला मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी 27 फेब्रुवारीला 2024 ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. या जागेचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे. याच जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. खरं तर राज्यसभेसाठी अजित पवार गटातून छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी आदी नावे चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीला आता एक नव्हे तर दोन खासदार मिळणार आहेत. कारण, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी आधीच बारामतीमध्ये विजय मिळवला आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्या बारामती मतदारसंघातून उभ्या होत्या. मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यामुळे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवायचं कि छगन भुजबळ यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला राज्यसभा द्यायची अशा धर्मसंकटात अजित पवार होते. अखेर सुनेत्रा पवार यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.