हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कडून सातत्याने त्यांच्यावर ५० खोक्यांवरून आरोप करण्यात आले. ५० खोके एकदम ओक्के अशी नारेबाजीही विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आपल्याला पहायला मिळाली . यावरून मविआ आणि शिंदे गटातील आमदारांच्यात राडा झाला होता. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाविकास आघाडीला दिला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोळ्याच्या बैलाचा फोटो ट्विट करत शिंदे गटाला डिवचले आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विटर वर बैलाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर ५० खोके ok अशा शब्दात बैलाला रंगवल्याचे दिसत आहेत. आज बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांना सजावट करताना हा खोचक संदेश बैलावर लिहिण्यात आला आहे. हा फोटो ट्विट करत आता काय या बैलाला शिंगावर घेणार का? मी तर म्हणतो आणि घेऊनच बघा…. असं म्हणत मिटकरी यांनी शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मिटकरी यांच्या या ट्विटनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे आता पहावं लागेल.
आता काय या बैलाला शिंगावर घेणार का?
मी तर म्हणतो आणि घेऊनच बघा…. pic.twitter.com/jvurkjI1xp— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 26, 2022
दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात घोषणाबाजी वेळी शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि एकमेकांना धक्काबुकी झालेली पाहायला मिळाल होते. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात राडा झाला होता. यानंतर होय, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली आणि कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ असा इशारा भरत गोगावले यांनी विरोधकांना दिला होता. या एकूण सर्व घडामोडींनंतर मिटकरी यांचे ट्विट लक्ष वेधत आहे.