सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज आपल्या शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतल्याचे दिसून आले. लोकांनी ज्यांना विधानसभा, लोकसभेला बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची गरज वाटतं नाही, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांवर केली आहे. शरद पवार आज सातारा येथे आले असता त्यांनी विविध प्रश्नांवर पत्रकारांसोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी त्यांना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत छेडण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत पडळकरांवर बोचरी टीका केली.
शरद पवार म्हणाले कि, ”पडळकरांना कशाला उत्तर द्यावं. त्यांना महत्त्व देऊन नोंद घ्यावी वाटत नाही. बारामतीत विधानसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. परवा लोकसभेला सांगलीला की कुठे उभे होते. तिथेही डिपॉझिट जप्त झालं. त्याआधीही त्यांचं लोकसभेला त्यांचा पराभव झाला. लोकांनी एकदम बाजूला केलेल्या अशा माणसांची नोंद का घ्यायची? असा उपहासात्मक सवाल करत शरद पवार यांनी पडळकरांना टोला लगावला.
असं काय म्हणाले होते पडळकर?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.असं पडळकर म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”