हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात कोरोना मुळे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांचे अस अकाली जाणे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत आपली हळहळ व्यक्त केली.
“पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ifO4z8cRCl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2020
कोरोनाची लागण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भारत भालके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’