हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीची नोटीस मलाही येईल पण ज्या ज्या आमदारांना किंवा खासदारांना ईडीची नोटीस येईल ते भाजपचे नक्कीच नसतील. ईडीचा वापर राजकीय दृष्टीकोनातून केला जात असून ईडी हे भाजपच्या हातातील हत्यार झालं आहे. त्यामुळे ईडीची जी लेवल होती ती आता काही राहिली नाही, अस रोहित पवार म्हणाले.
वर्षा राऊत यांना नोटीस का?
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’