टीम हॅलो महाराष्ट्र, नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी विषयी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी म्हंटले की, संजय राऊत यांनी केलेल्या विधानापासून दूर आहे. मला त्या वादात पडायच नाही. पण इंदिरा गांधी यांच्याविषयी त्यांनी तसं बोलायला नको होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. नाशिक येथे कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पत्रकारांनी त्यांना संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी प्रश्न विचारला होता. त्यांनी ते विधान मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला आहे,’ असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. सगळेच काही माहिती नसतात. महंमद अली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असंही वादळ उठलं होतं. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती.’ अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये अशी सूचना आपण नेत्यांना करणार नाही. कारण सर्व शहाणे आहेत. सरकार ५ वर्ष चालवायचं आहे. काँग्रेस व्यवहारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तीन पक्षांचं सरकार करतांना आम्ही काही निर्णय घेतले. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण ठरवलं. शेती पुनर्बांधणीसंदर्भातलं धोरण ठरवलं. या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.