उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद परांडा नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वसीम जाकीर सौदागर याच्यावर जमिनीवर शासकीय आरक्षण असताना देखील जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आज कारवाई करत वसीम जाकीर सौदागर याला अटक केली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूकच्या पूर्वी राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे.
काय आहे नेमके प्रकरण
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील जमीन सर्वे नं.234 /ब यांचे खरेदी खत करून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आरक्षित जमिनीचे बेकायदेशीररित्या नावे केल्याप्रकरणी वसीम जाकीर सौदागर यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज परंडा पोलिसांनी कारवाई करत आरोपी वसीम सौदागर याला बेड्या ठोकल्या आहेत.
परांडा शहरातील 234 गट ब मधील जमिनीवर शासकीय आरक्षण आहे. पण तरीदेखील हि जमीन खरेदी केल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. जाकीर सौदागर आणि वसीम जाकीर सौदागर या बापलेकांवर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याअगोदरसुद्धा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नगरपालिका मधील कर्मचारीसुद्धा दोषी आढळून आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारी दाखल होऊन बराच काळ लोटला यानंतर आज हि कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.