मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. मात्र अशातच औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. (NCP Rohit Pawar Tweet On Mahebub shaikh Case)

राष्ट्रवादीचे आमदार युवा नेते रोहित पवार यांनी प्रथमच याप्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही याप्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या भाजपवर जोरदार शरसंधान साधलं आहे. एखाद्याचे चारित्र्यहनन करून आसुरी आनंद लुटणाऱ्यानो हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे?, असा सवाल करत भाजपवर जोरदार टीका केलीय. तुमच्या अनेक आमदार खासदारांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. जेव्हा काढू तेव्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा देत हिरव्या देठाची भाषा महाराष्ट्र विसरला नसल्याचं मिटकरी म्हणाले.

काय आहे प्रकरण?
औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचं म्हणणं काय…?
मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आलीय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केलाय. औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.

मेहबूब शेख यांचा खुलासा
औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले. संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतोय, असं मेहबूब शेख म्हणाले. 14 नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असंही मेहबूब शेख म्हणाले. मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment