हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवणारी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भात (NCP Party And Logo) निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याचा मोठा धक्का बसला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ आणि नाव दोन्ही अजित पवार यांना देण्यात आले आहे. यामुळे अजित पवार गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावरून अजित पवार आणि शरद पवार गटात वाद सुरू होता. अखेर आज निवडणूक आयोगाने निकाल (NCP Party And Logo) दिल्यामुळे या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्य म्हणजे, आज लागलेल्या निकालात निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाच्या आमदाराला स्वातंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाच्या कोणत्याही आमदारांवर व्हीपच्या मुद्द्यावरुन अपात्रतेच्या कारवाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. शरद पवार गटाला स्वातंत्र्य मान्यता देण्यात आल्यानंतर आयोगाने उद्यापर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह कळवावे, अशा सूचना दिल्या आहेत. शरद पवार गटाकडून उद्या चारपर्यंत आयोगाला तीन पर्याय द्यायचे आहे. यातील एक पर्याय आयोग निवडेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केला. त्यावेळी त्यांनी हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावासंदर्भात आयोग कोणता निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.