हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला जबरदस्त यश मिळाले.
या विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीचे अभिनंदन केले आहे, तसेच भाजपलाही जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे की, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे”.
भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी #मविआ साठी निष्ठेची होती.राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.या निवडणुकीत जनतेने #मविआ ची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2020
ते पुढे म्हणाले, “भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही”.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’