मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्तास्थापनेचे सर्व अधिकार आता शरद पवार यांच्या हाती देण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकींतून आता समोर येत आहे. सत्तास्थापनेचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सत्तास्थापनेचा निर्णय घेईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.
मुंबईतील वाय.बी चव्हाण सभागृहात आज राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि वरिष्ठ नेत्याची बैठक बोलावली होती. याबैठकीनंतर नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व ५४ आमदारांना राष्ट्रवादी प्रांत अध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांनी मार्गदर्शन करून एक ठराव पारित केला आहे. त्यानुसार सत्तस्थानेचा जो काही निर्णय होईल त्याचे सर्व अधिकार शरद पवार याना देण्यात आले. सध्या आमच्याकडे बहुमत नाही आहे. तसेच सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या एकत्रित येण्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही असे स्पष्टीकरणही मलिक यांनी यावेळी दिले.
दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात ५.३० वाजता महत्वाची बैठक होणार आहे. याबैठकीत काँग्रेसकडून अहमद पटेल, के.सी वेणुगोपाल, मल्लिकाअर्जुन खडगे हजेरी लावणार आहेत. या बैठकीतच सत्तास्थापनेचा निर्णय होणार आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी राष्ट्रवादीला आज ८.३० पर्यंत सत्तास्थापनेसाठी अवधी दिला आहे. मात्र, राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे असे वृत्तसुद्धा समोर आले आहे. त्यामुळे आज शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.