अहमदनगर | शरद पवारांचा मुंबईतील बंगला सिल्वर ओकवरील सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत. असं राजेश टोपे म्हणाले.
शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. “शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांनी स्वतः ची काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी आणि प्रेम यामुळे ते राज्यभर दौरे करत असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही,” असं राजेश टोपे म्हणाले