विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयाचा विडा उचलला होता. त्यानी राज्यभरात अनेक दौरे केले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांना मोठी साथ दिली होती. राज्यातील त्यांच्या झंझावाती प्रचाराला मोठं यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे.
२०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला होता. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या धक्क्यांच्या सामना करावा लागला होता. अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर झंझावाती दौरे केले होते. त्यांच्या या दौऱ्यांना मोठं यश मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
त्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामाही दिला होता. त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भर पावसात शरद पवार यांनी घेतलेल्या सभेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला झाल्याचं दिसून आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसनं तितका प्रचार केला नाही. तर उलटपक्षी शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि त्यांच्या प्रचाराला मोठं यशही मिळताना दिसून येत आहे. प्रचारादरम्यान त्यांनी ५० पेक्षा अधिक सभा घेतल्या. त्याचाच परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला आता होताना दिसत आहे.