सोलापूर प्रतिनिधी |शरद पवारांनी मैदान सोडून पाळल्याने गाजलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने आपले कमळ फुलवले असून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ७५ हजार ८०४ मतांनी विजयी झाले आहेत. मोहिते पाटील गटाने मोहिते पाटलांचा स्वाभिमान काय आहे हे या निवडणुकीच्या विजयातून बारामतीच्या पवार घराण्याला दाखवून दिले आहे. तर मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघासाठी खऱ्या अर्थाने भाजपचे किंगमेकर झाले आहे.
मोहिते पाटलांनी माळशिरस मतदारसंघातून १ लाखाचे लीड दिल्यास आपण राजकीय संन्यास घेणार अशी घोषणा संजय शिंदे यांनी केली होती. मोहिते पाटलांनी आपल्या बालेकिल्ल्यातून म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला १ लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे संजय शिंदे आता राजकीय संन्यास घेणार का हा देखील प्रश्न महत्वाचा आहे.
पहिल्या तिन फेऱ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह निंबाळकर पिछाडीवर होते मात्र त्यांनी ४ थ्या फेरी मध्ये आघाडी घेतली आणि ती आघाडी कायम टिकवली. शरद पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा बनवला त्यानंतर येथील भाजपच्या नेत्यांनी भाजपचा हा मतदारसंघ चांगलाच लढवला आणि जिंकून दाखवला आहे. राष्ट्रवादीला हा सोलापूर जिल्ह्यातील मोठा हादरा असल्याचे बोलले जाते आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने आगामी काळात मोठी समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.