हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील बीएड कॉलेज (B,ed Colleges) याबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आता देशातील कोणतेही महाविद्यालय फक्त बी.एड (बॅचलर ऑफ एज्युकेशन) पदवी देऊ शकणार नाही. याबाबत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) मोठा निर्णय घेत सर्व महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार, फक्त बी.एड अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांना आता इतर विषयांचेही शिक्षण द्यावे लागेल. NCTE च्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासहित देशभरातील सर्वच बीएड कॉलेजवर परिणाम होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत एनसीटीईने (NCTE) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यातम्हटले आहे की फक्त बी.एड अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालये आता बहुविद्याशाखीय पदवी महाविद्यालयांशी जोडली जातील. याचा अर्थ असा की आता अशा महाविद्यालयांना इतर विषयांचेही शिक्षण द्यावे लागेल. २०३० पर्यंत बहुविद्याशाखीय पदवी महाविद्यालयात अभ्यासक्रम विलीन होतील. विलीनीकरणानंतर, ही महाविद्यालये केवळ बी.एड शिक्षणच देणार नाहीत तर बीए, बीएससी, बीकॉम इत्यादी शिक्षणही देऊ शकतील. त्यानंतर, प्रत्येक अभ्यासक्रमात ५०-५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी दिली जाईल.
या निर्णयामुळे बीएड कॉलेज बंद होणार असे अजिबात नाही तर याउलट बी.एड. संस्थांना अन्य विषयांची पदवी देण्याचा अधिकार सुद्धा मिळणार आहे. खरं तर देशात १५,००० हून अधिक बी.एड महाविद्यालये आहेत. परंतु त्यातील अनेक कॉलेज मध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने ती बंद पडण्याच्या मार्गावर होती. परंतु एनसीटीईच्या या निर्णयामुळे त्यांना एक नवीन संधी मिळाली आहे. आता ही महाविद्यालये इतर विषयही शिकवू शकतील, विषय वाढल्याने ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल आणि संस्था आणखी मजबूत होतील.
याशिवाय, आता विद्यार्थी बारावीनंतरही बी.एड अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. यासाठी बीए-बी.एड, बी.एससी-बी.एड आणि बी.कॉम-बी.एड असे चार वर्षांचे इंटीग्रेटेड प्रोग्राम सुरू करण्यात आले आहेत. या बदलामुळे शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा मिळेल आणि शिक्षक बनण्याची तयारी करणाऱ्या तरुणांना लवकर संधी मिळेल.