लातूर । JEE (main) परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आल्यानंतर NEET UG-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात NTAने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं होतं. याच धर्तीवर परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण, मुळात मात्र चित्र वेगळंच आहे. NEET च्या परीक्षेसाठी विद्यार्थींना घराजवळील सेंटर दिलं नसल्याची माहिती समोर येत आहे.
“झी २४ तास” या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लातूरच्या विद्यार्थ्याला उदगीर हे सेंटर देण्यात आलं, तर उदगीरच्या विद्यार्थ्याला लातूर सेंटर आलं आहे. कोविडच्या काळात घराजवळील परीक्षा केंद्र येणं अपेक्षित होतं. पण, तसं झालेलं नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना घराजवळील सेंटर मिळावं यासाठी केंद्राने सेंटर बदलून द्यावे अशी मागणीही होत आहे.
मुळात नीटच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाईल. पुढील वर्षी जर एकत्र परीक्षा झाली तर २ वर्षाच्या एकत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांची संख्या 40 लाखाच्या घरात जाईल आणि मेडिकलच्या जागा मात्र तेवढ्याच असतील. ही बाब सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे.
दरम्यान, NEET आणि JEE च्या परीक्षांच्या मुद्द्यावरून केंद्र विरुद्ध विविध राज्यांच्या सरकारमध्ये दुमत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्री, काँग्रेसचं समर्थन असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक बैठक घेतली. ज्यामध्ये NEET आणि JEE परीक्षा अशा मुद्द्यावर चर्चा झाली. NEET आणि JEE या दोन्ही परीक्षांना सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदिल दाखवला आहे. पण, काँग्रेस, शिवसेना आणि टीएमसीसह काही पक्षांनी मिळून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”