कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. आज मंगळवारी सापडलेले रुग्ण आगाशिवनगर आणि वनवसमाची येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे ३० कोरोना बाधित रुग्ण आहेत. सातारा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने सध्या कराड शहर आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यानी येथील अनेक भागांत कलम १४४ लागू केले असून संपुर्ण संचारबंदी जारी केली आहे.
दरम्यान, शनिवारी कराड तालुक्यात एकाच दिवशी १२ जणांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी आणखी २ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. आता आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे. आज फलटण येथेही एक कोरोनारुग्ण सापडला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.