हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज महाराष्ट्र काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरून दिली आहे. यावेळी नियुक्त्या जाहीर करत त्यांनी नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानसभा गटातील प्रमुख नियुक्त्या
महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी काही महत्त्वाच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा उपनेते म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची निवड झाली आहे. विधिमंडळ पक्षाचे सचिव आणि विधानसभा प्रतोद म्हणून शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राण यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
विधान परिषदेतील नियुक्त्या
महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेत पक्ष अधिक मजबूत होईल, असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे. तसेच, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून अभिजीत वंजारी यांची निवड झाली आहे. यासह प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतिसाद
या नव्या नियुक्तीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानपरिषद व विधानसभा गटातील नव्या पदाधिकाऱ्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सपकाळ यांनी नमूद केले की, हे सर्व नेते काँग्रेस पक्षाच्या धोरणांना पुढे नेण्यास कटिबद्ध राहतील आणि महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन जनतेच्या हितासाठी काम करतील.
दरम्यान, या नव्या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्र काँग्रेसला विधिमंडळात अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. आगामी राजकीय वातावरण लक्षात घेता हे नेते काँग्रेसच्या भूमिकांना प्रभावीपणे मांडतील आणि पक्ष संघटन अधिक बळकट करतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या पक्षाच्या आगामी रणनीतींसाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचे म्हणले जात आहे.