पर्यावरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तक – पर्यावरण व परिस्थितिकी

पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं. पण एखादं असं पुस्तक बाजारात आलं असेल की ज्यामध्ये विषयाच्या नोट्सच तुम्हाला काढून दिलेल्या असतील..? ते ही झकास रंगसंगती आणि चित्रांच्या माध्यमातून..!! ऐकायला थोडं वेगळं वाटलं तरी युनिक अकॅडमीने पर्यावरण विषयाच्या बाबतीत ही किमया करुन दाखवली आहे.

काही पुस्तकं ही अशी असतात की ती ठराविक वयोगटासाठी मर्यादित ठेवताच येत नाहीत. पर्यावरण व परिस्थितिकी हे युनिक अकॅडमीद्वारे काढण्यात आलेलं पुस्तकही याच प्रकारातील. पर्यावरण विषयाची माहितीपर अंकलिपी असंच या पुस्तकाचं वर्णन करता येईल. अंकलिपी असा जरी उल्लेख केला तरी त्यातील माहितीचा साठा हा शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपयोगी असा आहे.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या तीन घटकांचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरणविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे, क्लिष्ट असलेली माहिती सोप्या पद्धतीने लक्षात ठेवणे आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक चालू घडामोडींचा वेध घेणे यांचा समावेश होतो. पर्यावरण अभ्यासासंदर्भातील ७ मुख्य आणि १८ उपघटकांमध्ये या पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरण व परिस्थितिकी, जैवविविधता, जैवविविधता संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, हवामान बदल, जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि परिशिष्टतील महत्वपूर्ण माहिती याचा समावेश होतो. केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी पर्यावरण विषयाची जी तयारी करणं आवश्यक आहे त्याचा मुद्देसूद मसूदाच या पुस्तकाने बनवला आहे.

पुस्तकाचं वेगळेपण काय?

१. रंगसंगती आणि चित्रांचा मुबलक वापर – शालेय अभ्यासक्रमानंतर रंगीत पुस्तकं पाहण्याची सवय विद्यार्थ्यांना नसते. या पुस्तकाची रचना एनसीईआरटीच्या पुस्तकांप्रमाणे असून रंगीत पानांच्या आणि चित्रांच्या वापरामुळे दृश्य स्वरुपात विषय समजण्यात मदत होत आहे. उदा. सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय प्रदेश, टुंड्रा प्रदेश, विविध प्राणी आणि पक्ष्यांची चित्रं ही दिलेल्या माहितीच्या शेजारीच असल्याने त्याचा वेगळा विचार करण्याची गरज वाचकाला पडत नाही.

२. आकृत्यांचा समर्पक वापर – चित्र आणि रंगसंगतीइतकंच महत्त्व आकृत्यांना आहे. माहितीचं रूपांतर आकृत्यांमध्ये करुन कमी वेळात जास्त माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात आला आहे. निळ्या रंगाच्या चौकटीत या आकृत्या तुम्हाला पुस्तकात पहायला मिळतील.

३. थोडक्यात महत्त्वाचं – एखादा मजकूर वाचत असताना एखादी नवीन संकल्पना मध्येच आली, तर मोबाईल काढून ती शोधण्याचा ताप या पुस्तकाने वाचवला आहे. काही इंग्रजी नावं आणि वाचकांच्या दृष्टीने नवीन वाटतील अशा कल्पना ५० ते १०० शब्दांत सांगण्याचा यशस्वी खटाटोप लेखकांनी या पुस्तकात केला आहे. पुस्तकात गुलाबी रंगाच्या चौकटीत असलेला मजकूर वाचून तुम्हाला याची अधिक माहिती समजू शकेल.

४. माईंड पायलट – पुस्तकामध्ये दिलेल्या प्रत्येक प्रकरणाचा सारांश माईंड पायलटमध्ये आहे. वाचलेल्या माहितीमधलं आपल्या लक्षात काय राहिलं याची ओझरती नजर या घटकातून आपल्याला टाकता येते. हा भाग हिरव्या रंगाचा चौकटीत आपल्याला पाहता येईल.

५. युनिक फॅक्टस – परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे कायदे, तांत्रिक माहिती, चालू घडामोडी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे संदर्भ यांचा अंतर्भाव युनिक फॅक्टसमध्ये करण्यात आला आहे.

या सर्वासोबत सामाजिक दृष्टिकोनाच्या वेगळेपणाचा विशेष उल्लेखही इथे करणं गरजेचं आहे. मागील दशकभरात जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि इतर पर्यावरणीय समस्यांमुळे जगभरातील लोक त्रस्त आहेत. विविध पातळीवर चर्चा, परिसंवाद होत असताना शेतकरी वर्गाचं (बळीराजाचं) नुकसान हे केवळ राजकारणाचा भाग बनून गेलं आहे. या शेतकऱ्यांच्या हितासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचं समजून अतुल कोटलवार, इंद्रजीत यादव आणि युनिक परिवाराने हे पुस्तक बळीराजाला समर्पित केलं आहे. या पुस्तकाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी केवळ गुणांचा विचार न करता बळीराजाच्या संघर्षमय जीवनाचा विचार करावा हा हेतू लेखकांनी मांडला आहे. या पुस्तकाचं प्रकाशनही शेतकरी आत्महत्याग्रस्तांची संख्या सर्वाधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आलं. पुस्तकाच्या मलपृष्ठावरही छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरण संरक्षणासाठी लिहलेलं आज्ञापत्र छापण्यात आलं आहे.

एकूण काय, प्रशासकीय अधिकारी बनण्याची स्पर्धा परीक्षा असुदे किंवा जगण्याची स्पर्धा – पर्यावरण विषयाला वगळून पुढे जाताच येणार नाही. तुमची वाचनाची आवड आजही कायम असेल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवं.

पर्यावरण परिस्थितिकीचा परीक्षाभिमुख आढावा घेण्यासाठी आढावा दौरा

पुस्तकाविषयी अधिक –

नाव – पर्यावरण व परिस्थितिकी
लेखक – अतुल कोटलवार, इंद्रजीत यादव
प्रकाशक – युनिक अकॅडमी, पुणे
किंमत – ३०० रुपये मात्र

अधिक माहितीसाठी संपर्क – 9890192929

पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी व्हिडियो लिंक –

You might also like