हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काळात मुंबईमध्ये आम्ही नवीन क्रिकेट स्टेडियम (Mumbai New Cricket Stadium) उभारणार आहोत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. हे स्टेडियम सध्याच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा ४ पटीने मोठं असेल आणि त्यात एकाच वेळी तब्बल 1 लाख 30 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील असेही ते म्हणाले. भारताच्या विश्वविजेत्या संघातील ४ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधानभवनात सत्कार कऱण्यात आला त्यावेळी फडणवीसांनी आपल्या भाषणात नवीन क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याचे सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या रूपाने एक ऐतिहासिक असं स्टेडियम आहेच. परंतु आपल्या या क्रिकेटप्रेमी देशात हे स्टेडियम छोटं पडू लागलं आहे. अशा स्थितीत मुंबईत नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा विचार सुरू आहे. सर्व आधुनिक सुविधा असणारे हे स्टेडियम वानखेडेपेक्षा 4 पट मोठे असेल, अशी योजना आहे. वानखेडे येथे एकाच वेळी 32000 लोकांचे सामने पाहण्याची क्षमता आहे, म्हणजेच सुमारे 1 लाख 30 हजार लोकांना एकत्र बसून क्रिकेट सामन्याचा आनंद नवीन स्टेडियममध्ये घेता येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन स्टेडियमच्या आराखड्यावर चर्चा सुरू केली आहे.मात्र हे नवीन स्टेडियम कधीपासून उभारण्यात येईल याबद्दल मात्र त्यांनी कोणतीही माहिती सांगितली नाही.
दरम्यान, मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. क्रिकेटवेड्या मुंबईत आधीच तीन उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम आहेत. ज्यामध्ये वानखेडे व्यतिरिक्त, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमचा समावेश आहे. यातील वानखेडे स्टेडियम 32000 लोकांची आसन क्षमता आहे. तर डीवाय पाटील स्टेडियममध्ये 60 हजार आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये फक्त 20 हजार लोक बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु सध्या मुंबईतील बहुतांश सामने हे वानखेडे स्टेडियमवरच खेळवले जातात. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला होता ज्यामध्ये विजय मिळवत भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे अनेक अर्थानी वानखेडे स्टेडियम हे एक ऐतिहासिक स्टेडियम आहे.