नवी दिल्ली । देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी इन्फोसिसने इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी दूर केल्या आहेत आणि ते पुन्हा कार्यान्वित केले आहे. CNBCTV-18 ने 30 ऑक्टोबरच्या रिपोर्टमध्ये हे सांगितले आहे.
चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की,”IT ई-फायलिंग पोर्टलने योग्य प्रकारे काम करण्यास सुरुवात केली आहे आणि 90 टक्क्यांपर्यंत त्रुटी सुधारल्या आहेत. करदाते आता रिटर्न भरणे सुरू करू शकतात, उर्वरित विसंगती सुधारण्यासाठी इन्फोसिस काम करत आहे आणि ते 10-15 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.”
मात्र, चार्टर्ड अकाउंटंट याला सहमत नसून पोर्टल अजूनही नीट काम करत नसल्याचे सांगतात. ते म्हणाले की,”युजर्सना त्यांचा OTP मिळत नाही.” नाव न सांगण्याच्या अटीवर एका सीएने सांगितले की,”त्यामध्ये अजूनही अनेक विसंगती आहेत.”
इन्फोसिसला 2019 मध्ये मिळाले होते कॉन्ट्रॅक्ट
इन्फोसिसला 2019 मध्ये नेक्स्ट जनरेशन इन्कम टॅक्स भरण्याची सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. रिटर्नच्या छाननीची वेळ 63 दिवसांवरून एका दिवसावर आणणे आणि रिफंड प्रक्रियेला गती देणे हा यामागील उद्देश होता.
7 जून रोजी नवीन पोर्टल सुरू झाले
7 जून रोजी http://www.incometax.gov.in हे नवीन इन्कम टॅक्स पोर्टल मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. इन्फोसिसने ही नवी वेबसाइट तयार केली आहे.