सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथे सुरू होणाऱ्या मेडिकल कॉलेजला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा ठराव सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नाना पाटील यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वसाधारण सभेने मराठा आरक्षणाचाही ठराव मंजूर करून याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सभेत करण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाली. उपाध्याक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे अनोखे नाते आहे. महाराष्ट्र यशवंत विचारांवर चालत असल्याने त्यांच्याविषयी आदर आहे. यासाठी सातारा मेडिकल कॉलेजला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा ठराव उदय कबुले यांनी मांडला. तसेच जिल्हा रुग्णालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभारण्याचा उरावही कबुले यांनी मांडला. या दोन्ही उरावांना टाळ्यांच्या गजरात मान्यता देण्यात आली.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असा ठराव दत्ता अनपट यांनी मांडला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून ते मिळालेच पाहिजे, यासाठी सभेत एकमुखी मागणी करत पाठिंबा देण्यात आला.
सातारा जिल्हा परिषदेत बोगस अभियंते
सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बोगस अभियंते कार्यरत असल्याचा आरोप दीपक पवार यांनी केला होता. यावर त्यांनी मंगळवारच्या सभेत जे अभियंते बोगस आहेत त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. त्यावर उदय कबुले यांनी यादी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचा अहवाल १५ दिवसात देण्यात येईल, असे आश्वासन विनय गौडा यांनी दिले तर बांधकामचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे यांनी यासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यांच्यामार्फत अभियंत्यांच्या कागदपत्रे तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.