संसदेच्या नव्या इमारतीला गळती, हीच का मोदींची गॅरेंटी? विरोधक आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुने संसद भवन असूनही केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत थाटामाटात नवे संसद भवन बांधले. मात्र नव्या संसदत भवनाला फक्त १४ महिने उलटून होत नाहीत तोच त्याठिकाणी पावसामुळे पाणी गळायला सुरुवात (New Parliament building leaks) झाली आहे. तामिळनाडूच्या विरूधुनगर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार मणिकम टॅगोर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या विडिओनंतर विरोधक आक्रमक झाले असून हीच का मोदींची गॅरेंटी असा सवाल केला जात आहे.

मणिकम टॅगोर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता का नव्या संसदेत एका ठिकाणी पाणी गळतांना दिसत आहे. ते पाणी जमिनीवर पडू नये म्हणून त्याठिकाणी एक बादली सुद्धा ठेवण्यात आली आहे. हा व्हिडिओ शेअर करत मणिकम टॅगोर यांनी सरकारया लक्ष्य केलं आहे. बाहेर पेपर गळती,आतून पाण्याची गळती. नव्या संसदेच्या लॉबीमध्ये अवघ्या १ वर्षातच पाण्याची गळती पाहायला मिळत आहे असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही संसदेतील पाणी गळतीवर मोदींना थेट सवाल केला आहे. भारतातील कष्टकऱ्या करदात्यांचे १२०० कोटी रूपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे नवे संसदभवन उभारले. परंतु दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या १४ महिन्यात नव्या संसद भवनात गळती सुरू झाली आहे. ही आहे मोदी सरकारची निकृष्ट कामांची गॅरंटी..! असं म्हणत शरद पवार गटाने मोदींवर हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा नवीन संसद भवनात पाणी साचल्याचा मुद्द्यावरून आवाज उठवला. या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. अब्जो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या संसदेत गळती सुरू आहे. तोपर्यंत जुन्या संसदेत का जाऊ नये असा सवालही त्यांनी एक्सवरून विचारला आहे. भाजप सरकारच्या काळात बांधलेल्या प्रत्येक नवीन छतावरून पाणी टपकणे हा त्यांच्या विचारपूर्वक केलेल्या रचनेचा भाग आहे का, असा प्रश्न जनता विचारत आहे, असा सवाल अखिलेश यांनी केला.