हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची (PM Kisan Sanman Nidhi Yojana) दारे पुन्हा एकदा उघडली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, अद्यापही अनेक शेतकरी विविध कारणांमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा योजनेंतर्गत आणण्यासाठी सरकारने 15 एप्रिल 2025 पासून विशेष नोंदणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या नोंदणी प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मागील काही हप्त्यांचे पैसेही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही नाव नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. परंतु ही संधी चुकवली तर शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी
- शेतीयोग्य जमिनीचा मालकीहक्क असणे आवश्यक
- ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य
- पीएम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे गरजेचे
अर्ज कसा करावा?
नव्या शेतकरी नोंदणीसाठी सरकारने pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अर्ज करता येईल.
- – PM Kisan पोर्टल (pmkisan.gov.in) वर भेट द्या.
- – ‘नवीन शेतकरी नोंदणी’ (New Farmer Registration) वर क्लिक करा.
– आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा.
– सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. खास म्हणजे, या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदतीचा लाभ मिळत असल्यामुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होत आहे. त्यामुळे येत्या काळातही सरकारच्या या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश होण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार आहेत.