हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वेने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात ‘मिडल बर्थ’वर झोपणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू झाला आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) नवीन निर्देश जारी करत म्हणले आहे की, स्लीपर, थर्ड एसी आणि थर्ड एसी इकॉनॉमी कोचमधील ‘मिडल बर्थ’चे प्रवासी सकाळी ६ वाजण्यापूर्वी उठले पाहिजेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सहप्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मिडल बर्थ’वर झोपणाऱ्या प्रवाशांना रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत झोपण्याची परवानगी असते. मात्र, काही प्रवासी या वेळेचे पालन करत नाहीत. परिणामी, ‘लोअर बर्थ’वरील प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नियम मोडल्यास होऊ शकते कारवाई
नवीन नियमानुसार, जर ‘मिडल बर्थ’चा प्रवासी सकाळी ६ वाजल्यानंतरही उठला नाही आणि ‘लोअर बर्थ’वरील प्रवाशाने तक्रार केली, तर संबंधित प्रवाशावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, जर ‘लोअर बर्थ’वरील प्रवाशाला कोणतीही हरकत नसेल, तर कोणत्याही कारवाईचा प्रश्न येणार नाही.
दरम्यान, हा नवा नियम जाहीर झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही प्रवासी याला विरोध करताना दिसत आहेत. ‘मिडल बर्थ’साठी तिकीटाचा पूर्ण पैसा भरूनही वेळेचे बंधन पाळावे लागते, हे मान्य नसल्याचे अनेकांनी म्हणले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा नियम प्रवाशांच्या सोयीसाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे.