हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिर्डीतील (Shirdi) साईबाबा संस्थानकडून चालवल्या जाणाऱ्या साई प्रसादालयात रोज हजारो भाविक मोफत भोजनाचा (Free Meal) लाभ घेत असतात. मात्र काही दिवसांपासून प्रसादालयाच्या आवारात मद्यपान, धूम्रपान करून भाविक वावरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याचा त्रास इतर भाविकांना होत आहे. म्हणूनच साई संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 6 फेब्रुवारी 2025 पासून प्रसादालयात प्रवेशासाठी टोकण अनिवार्य करण्यात आले आहे.
भाविकांसाठी टोकण पद्धत लागू
साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना उदी-बुंदी प्रसादासोबत मोफत भोजनाचे टोकण देण्यात येणार आहे. तसेच, ज्या भाविकांना तत्काळ भोजन हवे असेल त्यांना प्रसादालयाच्या ठराविक ठिकाणी टोकण देण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिरातील सर्वच भाविकांना व्यवस्थित भोजनाचा लाभ मिळावा आणि अनुचित प्रकारांना आळा बसावा, म्हणून संस्थेने ही पद्धत सुरू केली आहे.
दरम्यान, साई प्रसादालय दररोज 50,000 भाविकांना मोफत भोजन दिले जाते. मात्र, अलीकडे काही लोक मद्यपान, धूम्रपान आणि अमली पदार्थांचे सेवन करून प्रसादालयात गोंधळ घालत असल्याचे निदर्शनात आले होते. तसेच, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या सुविधेचा गैरफायदा घेतल्याचे ही निदर्शनात आले होते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षितेचा विचार करत टोकण पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, प्रसादालयात नवीन टोकण पद्धती लागू झाल्यानंतर साई संस्थानने म्हणले की, “शिर्डीत आलेला कोणताही भाविक उपाशी राहणार नाही. संस्थानच्या रुग्णालयांतील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीही ही सुविधा असेल. या निर्णयामुळे भोजन व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल”.