3 लाख दिव्यांगाना मतदानासाठी मिळणार विशेष सुविधा
परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 3 लाखाहून अधिक दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी ‘ सुलभ निवडणुक ‘ उदिद्ष्ट ठेवून अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत.राज्यात अंध व अल्पदृष्टी असलेले 51 हजार 605 मतदार, मुकबधिर 35 हजार 887 मतदार अस्थिव्यंग असलेले एकूण 1 लाख 61 हजार 920 मतदार आणि अपंग म्हणून नावनोंदणी करण्यात आलेले 59 हजार 821 मतदार आहेत.
अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय करण्यात येणार आहे. अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी ईव्हिएम यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने ‘सुलभ निवडणुका’ हे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.