हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबाबत (New Toll System) नवीन घोषणा केली आहे. १ एप्रिलनंतर देशातील टोल सिस्टीम बदलणार असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहें. नवीन टोल सिस्टीममध्ये प्रवाशांना काही प्रमाणात सूट मिळेल. खाजगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असं नितीन गडकरी यांनी म्हंटल आहे.
नवीन टोल प्रणालीबाबत असे सांगण्यात येत आहे की भारत सरकार फास्टॅग वापरकर्त्यांना वन-टाइम पेमेंटद्वारे वार्षिक पास देऊ शकते. एका वेळी ३,००० रुपये जमा केल्यास पास मिळेल. यामुळे, वाहने एका वर्षासाठी कोणत्याही राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावरून जाऊ शकतील आणि त्यांना कोणताही टोल भरावा लागणार नाही. जे प्रवाशी वर्षातून अनेक वेळा त्यांच्या खाजगी गाड्यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे वरून प्रवास करत असतात अशा प्रवाशांना भारत सरकारच्या या नवीन धोरणाचा फायदा होईल. नवीन टोल पॉलिसीमुळे टोल स्वस्त तर होईलच पण टोल प्लाझावर वाहतूकही कमी होईल. जर ही सिस्टीम लागू केली गेली तर टोल प्लाझावरील वेटिंगचा वेळ वाचेल आणि प्रवासाचा अनुभव सुरळीत होईल असं सरकारला वाटत आहे. टोल वसुली आधुनिक करण्यासाठी, वाहतूक मंत्रालयाने ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) FASTag प्रणाली लागू करण्यासाठी प्रस्तावांसाठी विनंती केली आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांत भारताच्या टोल वसुलीत मोठी वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात, एकूण टोल महसूल ६४,८०९.८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ३५ टक्के टोल महसूलात वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये गोळा झालेल्या २७,५०३ कोटी रुपयांपेक्षा ही लक्षणीय वाढ म्हणावी लागेल. टोलच्या वाढत्या महसूलामुळे देशभरातील रस्त्यांचे जाळे सुद्धा उभारण्यास मोठी मदत होत आहे.