औरंगाबाद – औरंगाबाद करांची तहान भागवण्यासाठी तब्बल 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शासनाने जाहीर केली. परंतु, निधी देताना हात आखडता घेणे सुरू केले आहे. मनपाकडे समांतर जलवाहिनी योजनेचे पडून असलेल्या 187 कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, मनपाकडून अद्यापही हा निधी प्राधिकरणाला देण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाची गती मंदावल्याचे चित्र आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेत राज्य शासनाला 1176 कोटी म्हणजेच 70 टक्के तर 30 टक्के म्हणजेच 506 कोटी रुपये मनपाला हिस्सा टाकावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राधिकरणाकडून 1308 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. सध्या याअंतर्गत कामे सुरू आहेत. परंतु, प्राधिकरणाकडून कामासाठी चा निधी शासनाकडे मागितल्यानंतर तो मिळत नाही. त्याऐवजी शासन मनपाकडे पडून असलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेच्या निधीतून पैसे देण्याची सूचना केली. त्यावेळी 17 कोटी 23 लाख देण्यात आले होते.
आतासुद्धा शासनाने समांतर मधून 187 कोटी रुपये प्राधिकरणाला द्यावे, असे आदेश मनपाला दिले आहे. मनपाने हे पैसे दिल्यानंतर समांतर साठी प्राप्त झालेल्या पैकी 60 कोटी रुपये शिल्लक राहणार आहेत. प्राधिकरणाने मागणी केल्यानंतर शासनाकडून निधी देण्याऐवजी मनपाला समांतर मधून पैसे देण्याचे आदेशित करण्यात येत आहे.