औरंगाबाद – जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असल्याने नव्या वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. मात्र, जमावबंदी आणि करून नियमांचे उल्लंघन करत पुंडलिक नगर भागात एका हॉटेलमध्ये रात्री पावणे तीन वाजेच्या दरम्यान आरडाओरड करून न्यू इयर पार्टी साजरी करण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह 29 जणांच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या विषयी अधिक वृत्त असे की, 31 डिसेंबर रोजी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाने, पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यासह अन्य कर्मचारी हे पुंडलिक नगर भागात पोलिस बंदोबस्त करण्यासाठी तैनात होते. पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वरून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल कार्निवल येथे रात्री उशिरापर्यंत अनेक जण एकत्रित येऊन न्यूयर पार्टी साजरी करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह हॉटेल कार्निवल येथे पोहोचले. तिथे नव्या वर्षाची पार्टी जल्लोषात सुरू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, अंमलदार निलेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात हॉटेल चालकासह 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.