हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या जगभरात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. अमेरीका, भारत , यासारखे बलाढ्य देशही कोरोनाच्या विळख्यातून अजून सुटलेले नाहीत. कोरोनाला मात देणे जगातील मोठ्या देशांना जमले नाही ते अवघ्या 50 लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने पुन्हा करून दाखवले आहे. मागील शंभर दिवसांत न्यूझीलंडमध्ये एकही नवीन करोनाबाधित रुग्ण आढळला नाही.
ज्या वेळी भारताने लॉकडाउन जाहीर केलं त्याच वेळी न्यूझीलंडमध्येही सक्तीचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी १०० करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आता मागील १०० दिवसांपासून स्थानिक पातळीवर एकही करोनाबाधित आढळला नाही. न्यूझीलंडमध्ये मागील तीन महिन्यांपासून फक्त काहीच करोनाबाधित आढळले होते. यामध्ये परदेशातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना लागलीच ताबडतोब आयसोलेशन केंद्रामध्ये पाठवण्यात येत आहे. ओटागो विद्यापीठाचे महासाथ आजार तज्ञ प्रा. मायकल बेकर यांनी सांगितले की, चांगले राजकीय नेतृत्व आणि विज्ञान यांचा हा एकत्रित परिणाम आहे.
करोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वाचे सगळीकडे कौतुक होत आहे. लॉकडाउन दरम्यान त्यांनी करोनाबाबतची सर्व माहिती त्यांनी सातत्याने लोकांपर्यंत पोहचवली. लॉकडाउन सक्तीचे करताना त्यांनी करोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वास नागरिकांना दिला होता. करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. अखेर कठोर निर्बंधानंतर करोनाच्या संसर्गाला रोखण्यास यश मिळाले.