नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुगारात अनेक लोकांचे संसार आणि आयुष्य उध्वस्त झाले आहे. अनेकजण भीकेला लागले आहेत तर अनेकांनी आपलं जीवन संपवलं आहे. अशीच एक घटना इंदुरमध्ये घडली आहे. इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता. तो एमपीईबीमध्ये कार्यरत होता. तसेच त्याचे तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झाले होते.
ऑनलाइन सट्टेत हरलेल्या पैशांमुळे मृत व्यक्ती तणावामध्ये होता. त्याबाबत त्याने पत्नी आणि एका मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेजही पाठवला होता. मृत दिव्यांशु मेहता एमपीईबीमध्ये सीसीआय पदावर कार्यरत होता. त्याच्या मित्राने सांगितलं की, पहिल्यांदा दिव्यांशु ७० हजार रूपये हरला होता. त्यानंतर पुन्हा तो तेवढेच रूपये सट्ट्यात हरला होता त्यामुळे तो प्रचंड तणावात होता.
या व्यक्तीचा ३ महिन्यापूर्वीच प्रेम विवाह झाला होता. सध्या मृत्यूमागे कोणताही कौटुंबीक तणाव समोर आलेला नाही. पण त्याच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार तो ऑनलाइन सट्टा खेळत असल्याने आणि त्यात पैसे गमवाल्याने तो तणावात होता. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील चौकशी सुरु केली आहे.