हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार खेळी करत शतक झळकावले. शतकानंतर अजिंक्य आणखी मोठी खेळी करून टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवानं तो बाद झाला. त्याच्या सुंदर खेळीचा असा शेवट होईल, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. रवींद्र जडेजाने एका धावेसाठी घाई केली आणि अजिंक्यला विकेट गमवावी लागली. परंतु त्यानंतर अजिंक्यनं जे केलं, ते कौतुकास्पद होतं.
नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जडेजानं शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि अर्धशतकीय धावेसाठी अजिंक्यला कॉल दिला. अजिंक्यनेही त्वरीत प्रतिसाद देताना धाव घेतली, पण मार्नस लाबुशेननं चेंडू यष्टिरक्षक टीम पेनकडे दिला. थोडक्यात अजिंक्य धावबाद झाला. आपण घाई केली, हे जडेजाला कळून चुकले आणि त्यानं मान खाली घातली. पण, पॅव्हेलियनमध्ये जाता जाता अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला प्रोत्साहन दिले.
अजिंक्यच्या या कृतीनं पुन्हा एकदा त्याच्यातला खरा कर्णधार अनुभवायला मिळाला. दरम्यान आज दिवसाखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 133- 6 अशी असून कांगारूंकडे फक्त 2 धावांची आघाडी आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’