Nicholas Pooran : एकाच ओव्हरमध्ये 36 धावा… निकोलस पुरनच्या वादळात अफगाणिस्तान ढेर (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विकेटकिपर फलंदाज निकोलस पुरनने (Nicholas Pooran) अवघ्या ५३ चेंडूत ९८ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. खास गोष्ट म्हणजे अजमतुल्ला ओमरझाईने टाकलेल्या डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये पूरनने चांगलाच तडाखा देत तब्बल ३६ धावा चोपल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एका षटकात 36 धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 36 धावा ठोकल्या होत्या.

ओमरझाईने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर चौकार मारला गेला. सलग मारलेल्या चौकार- षट्कारामुळे अजमतुल्ला उमरझाई दबावात आला आणि त्यातच त्याने तिसरा चेंडू वाईड टाकला. आणि तो इतक्या लांबचा वाईड होता कि त्यावर चौकार गेला. म्हणजेच एकाच चेंडूवर अझमतुल्लाह ओमरझाईने 16 धावा दिल्या. दुसऱ्या कायदेशीर चेंडूवर फ्री हिट होता मात्र पूरना धाव काढता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लागोपाठ २ चौकार मारले. यानंतर निकोलस पुरनने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर २ षटकार मारले. अशा प्रकारे या षटकात एकूण 36 धावा झाल्या. निकोलस पुरनच्या वादळात अफगाणिस्तानचे गोलंदाज पुरते ढेर पाहायला मिळाले.

दरम्यान, निकोलस पूरनच्या या वादळी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने २० षटकात २१८ धावांचा डोंगर उभारला. पूरनशिवाय जॉन्सन चार्लने ४६, शाई होप २५, आणि रोवमन पॉवेलने २६ धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्यतर २१९ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ गडबडला… अवघ्या ११४ धावांतच त्यांचा संघ गुंडाळला आणि वेस्ट इंडिजने १०४ धावांनी मोठा विजय मिळवला.