टीम हॅलो महाराष्ट्र । आदित्य ठाकरे यांचं मुबंईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याचं स्वप्न आता सत्यात उतरत आहे. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. नाईट लाईफची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी मांडली होती.
आता या संकल्पनेला शासनाने हिरवा कंदील असून आदित्य यांचं स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे असं म्हणता येईल. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते २४ तास व्यवसाय करु शकतात. या निर्णयानंतर तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे.
मात्र, मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याच्या शासनाने निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. मुंबईत हॉटेल्स, बार, पब २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स,पब २४ तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.