हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावरच राष्ट्रवादीला म्हणजेच (अजित पवार गटाला) एक मोठा धक्का बसला आहे. आज आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. त्यामुळेच आता निलेश लंके यांना नगर दक्षिण म्हणून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आगामी निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून निलेश लंके अशी लढत पाहायला मिळेल.
आज लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश
समोर आलेल्या माहितीनुसार, आज निलेश लंके अधिकृतपणे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करतील. खरे तर, गेल्या काही दिवसांपासूनच निलेश लंके शरद पवार गटात दाखल होतील अशी चर्चा रंगली होती. आता लंके अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. याचवेळी त्यांना उमेदवारी जाहीर करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. निलेश लंके शरद पवार गटात आल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीला देखील होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढेल.
मुख्य म्हणजे, नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना आघाडीत येऊन तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची खुली ऑफर दिली होती. “महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं” असे त्यावेळी कोल्हे यांनी म्हटले होते. यानंतर लंके यांनी देखील आपल्या वक्तव्यातून सूचक संकेत दिले होते. यानंतर आता थेट ते शरद पवार गटात जाणार असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून निलेश लंके यांच्याकडे पाहिले जात होते. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून त्यांचे या मतदारसंघात चांगले वर्चस्व देखील आहे. परंतु निलेश लंके लोकसभेसाठी अहमदनगर मधून निवडणूक लढवू इच्छित होते. परंतु अजित पवार गटाला फक्त तीन-चार जागा मिळणार असल्याच्या चर्चामुळे त्यांची मोठी निराशा झाली होती. या सर्व गोंधळातच त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.